हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या आहेत. आताकुठे रब्बीच्या पिकांची उगवण सुरु झाली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गहू वगळता सर्व पिकच्या पेरण्या जवळपास सरासरी क्षेत्रावर झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तब्बल 26 हजार हेक्टरावरील पिके ही धोक्यात आहेत. त्यामुळेच कृषी अधिकाऱ्यांना थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागत आहे.
पिकनिहाय असा आहे किडीचा प्रादुर्भाव
यंदा उशिरा का होईना पण सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर अधिकचा भर दिला आहे. पण हऱभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवरील रोगराई वाढत आहे. ज्वारी व मका या पिकांवर लष्करी अळीचे प्रमाण वाढत आहे. सध्याचे वातावरण हे पिक वाढीसाठी नाही पिकांवर अळी वाढण्यासाठी पोषक आहे. गहू या पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या पिकांची उगवण झाली असून ऐन पिक बहरात येण्याच्या मोसमातच ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होत आहे.
असे करा पिकांवरील अळींचे नियंत्रण
–हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे पण या पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 5 टक्के निंबोळी अर्क, एकरी 2 कामगंध सापळे व 20 पक्षा थांबे बसवावे लागणार आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम क्विनॅालफास हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
–ज्वारी व मका–मका व ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी सुरवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्क, इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम व 5 मिली लॅम्बडा सायहॅालोथ्रीन 9.5 झेड सी किंवा स्पिनेटोरम 4 मिली हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.
फवारणी करताना ही घ्या काळजी
फवारणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. अन्यथा महागडी औषधे खरेदी करुनही उपयोग होणार नाही. शिवाय प्रत्यक्ष पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सहायकांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे. शिवाय 50 टक्के अनुदानावर किटकनाशकांची मागणी कृषी कार्यालयांनी केली असून त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
संदर्भ: टीव्ही ९