हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी प्लास्टिकचे आच्छादन वापरून आपल्या बागा वाचवल्या आहेत. शेतकऱ्यांचा हा फंडा यशस्वी झाला आहे. आता द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी राज्यात १०० हेक्टर क्षेत्रावर प्लास्टिक आच्छादनाचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की , नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात १०० हेक्टरवरील बागांवर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील माहिती संकलित करून त्यानंतरच त्याच्या राज्यव्यापी अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल, असेही कृषिमंत्र्यांचे म्हणणे आहे.
द्राक्षबागा वाचवण्यासाठी केंद्राकडे मागणार मदतीचा हात
द्राक्ष बागांना प्लॅस्टिक आच्छादन केले की नैसर्गिक आपत्तीतही बागा वाचतात, हे शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या प्रयोगातूनही सिद्ध झाले आहे. उघड्या बागेवर फवारणीनंतर पाऊस आला की शेतकऱ्यांचे श्रम, पैसा अन् वेळही वाया जाते. बागेवर प्लॅस्टिक आच्छादन असेल तर हे सर्व वाचते. द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादनासाठीचा खर्च एकरी तीन ते चार लाख रुपये असून तो बहुतांश बागायतदारांना परवडणारा नाही. द्राक्षाला भावही कमीच मिळत आहे. १०० हेक्टरवरील प्रयोगातून प्लॅस्टिक आच्छादनाचे फायदे राज्य शासनाच्या लक्षात आल्यावर राज्यातील सर्वच द्राक्ष बागांवर अनुदानातून प्लॅस्टिक आच्छादनाची तत्काळ अंमलबजावणी हाती घ्यावी. याबाबत केंद्र सरकारनेही काही वाटा उचलावा, अशी मागणी राज्य सरकारने लावून धरली आहे. त्यावर केंद्र सरकारने देखील गांभीर्याने विचार करायला हवा.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे मोठे आव्हान
द्राक्षाची शेती करणे म्हणजे मोठा खर्च आणि मोठी मेहनत याकरिता लागते. मात्र नैसर्गिक संकटाना तोंड देताना शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मागील वर्षी पावसाळा अगदी नोव्हेम्बर महिन्यापर्यंत लांबला. गारपीट ,अति थंडी यामुळे द्राक्ष बागांवर भुरी , डाऊनी अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. सकाळी धुके अन् दुपारी उन्हामुळे द्राक्ष मणी तडकणे, त्यावर डाग पडणे, अशा समस्या काही ठिकाणी वाढल्या. त्यानंतर मार्च आणि आता एप्रिलमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस चालूच असल्याने काढणी चालू असलेल्या द्राक्षांचे अतोनात नुकसान होत आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर प्लॅस्टिकच्या आच्छादनाचा प्रयोग केला. त्याचा परिणाम सुद्धा चांगला मिळाला.