Onion Rate : 24 पोते कांदा विकला; 58 हजार खर्च अन् उत्पन्न मिळाले केवळ 557 रुपये!

Onion Rate In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक (Onion Rate) शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरूच आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून आतापर्यंत उन्हाळ कांद्याचा हंगाम संपत आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही कांदा पिकापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांचा दिखाऊ कळवळा असलेल्या सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी उठवलीही. मात्र, शेतकऱ्यांची थट्टा काही थांबलेली नाही. कारण सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या एक एकर जमिनीत भर उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे पीक घेतले. मात्र, या शेतकऱ्याला एकरी कांदा पिकातून (Onion Rate) केवळ 557 रुपयांचे उत्पन्न हाती लागले असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर कांदा उत्पादकांकडून केंद्र सरकारवर चौफेर संताप व्यक्त केला आहे.

लागवडीसाठी 58 हजार रुपये खर्च (Onion Rate In Maharashtra)

मारोती खांडेकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे रहिवासी आहेत. शेतकरी मारोती खांडेकर यांनी आपल्या एक एकरात कांद्याचे पीक घेतले होते. या एकरात त्यांनी 24 पाकिटे बियाण्यातून कांदा लावला होता. कांदा लागवड, मशागतीसह त्यांना जवळपास एकूण 58 हजार रुपये खर्च आला होता. सध्या त्यांच्या कांदा काढणीला झाल्यानंतर त्यांनी शनिवारी (ता.11) सोलापूर मार्केट समितीत आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळाले.

किती उत्पन्न मिळाले?

उन्हाळाभर दुष्काळी परिस्थिती असूनही कांदा पिकाला त्यांनी पाणी दिले होते. मात्र, कांद्याला कवडीमोल भाव (Onion Rate) मिळाल्याने, त्यांना एक एकरात उत्पादित झालेल्या 24 पोते कांद्याला केवळ 2866 रुपये मिळाले. त्यातूनही हमाल, तोलाई, मोटार भाडे असा एकूण 2309 खर्च वजा केल्यानंतर हाती फक्त 557 रुपये उरले. त्यामुळे आता शेतकऱ्याने शेतीमध्ये पीक घ्यायचे कसे? आणि जगायचे कसे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी दर मिळत नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यातीसाठी प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे. तर 40 टक्के निर्यात शुल्क आहे. याचाच मोठा फटका शेतकऱ्याला बसताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या कांदा निर्यातबंदी उठवूनही शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.