हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकासह इतर पिकांच्यावर मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र मराठवाड्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील तुरीचे पीक जोमात आले आहे. मात्र मागील ७-८ दिवसांपासून कधी पाऊस कधी दाट धुके तर कधी ऊन यामुळे तुरीच्या पिकावर परिणाम होत आहे. रात्री थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरण यामुळे तुरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुरीचं पीक सध्या शेंगा पोसण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेणे अत्त्यंत महत्वाचे आहे. मारुका अळीमुळे फुलावस्थेत असलेल्या तुरीची नासाडी होते. थेट शेंगाच खात असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाल्याने कृषी विभागाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी गरजेची आहे.
कसा ओळखाल मारुकाचा प्रादुर्भाव
–मारुका ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे.
–या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात.
–मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात.
–अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते.
–तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात.
–अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करते किंवा आतमध्येच राहून कळ्या, फुले खाते.
–तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते.
–अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा माती मध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसात पूर्ण होतो.
असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट
मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.
शेतकऱ्यांनी सुरक्षा कीटचा वापर करावा
आजही शेतकरी हे सुरक्षित कीटचा वापर न करताच शेतातील कामे करीत आहेत. विशेष: कीटकनाशकाची फवारणी करीत असाताना सुऱक्षा कीटचा वापर हा महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी केवळ सुरक्षा कीटचा वापर न केल्याने शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. पण आता अत्याधुनिक स्प्रे आले आहेत शिवाय सुरक्षतेची साधनेही वाढली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा सुरक्षित कीटचा वापर करण्याचे अवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संदर्भ : टीव्ही ९