हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक ठिकाणी अंशात: ढगाळ हवामान आहे. तसेच कोरडे हवामान होत आहे. काही भागात ऊन सावल्यांच्या खेळ होत असून अधून-मधून श्रावण सरींनी हजेरी लावली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून आसामच्या पश्चिम भागापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. हरियाणा पासून अरबी समुद्र पर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आणि बंगालचा नैऋत्य भाग आणि श्रीलंकेच्या किनारपट्टी व तमिळनाडू किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे फारसे पोषक वातावरण नसल्याने पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे.
उन्हाचा चटका वाढला
दरम्यान, पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ झाली आहे. पुढील पाच दिवस तरी राज्यात कोणत्याही भागात मोठय़ा पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.
अरबी समुद्र आणि किनारपट्टीचा भाग, बंगालचा उपसागर आणि विदर्भ ते पूर्व अरबी समुद्रापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे ऑगस्टमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. सध्या राज्यात पावसास पोषक वातावरण निर्माण होऊ शकेल, असा कोणताही कमी दाबाचा पट्टा नाही. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागातून ढगाळ वातावरणही दूर झाल्याने सूर्यकिरणे विनाअडथळा जमिनीपर्यंत येऊन उन्हाचा चटका वाढला आहे.