विमाकंपन्यांच्या प्रतिनिधींचा बांधावर पत्त्याच न्हाय…! पंचनामा व नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा का नाही ? शेतकरी संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी

मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले खरिपातील मुख्य पीक असणारे सोयाबीन पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती काहीच नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीये. सोयाबीन अक्षरश: शेतात कुजून जातोय… दुसरीकडे तक्रार दाखल करून देखील विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर तोंड दाखवायलाही येत नाहीत त्यामुळे एकीकडे आस्मानी आणि एकीकडे सुलतानी संकटात शेतकरी मात्र चिरडला जातोय… आता तरी सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करतोय.

विमाकंपन्यांच्या प्रतिनिधींचा बांधावर पत्याच न्हाय..! पंचनामा व नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा का नाही?

सोयाबीन कुजतेयं शेतात …

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या गौंडगाव शिवारातील गट क्रमांक 105 मध्ये 1 हेक्टर 32 आर क्षेत्रावर शेती करणाऱ्या मुंजाभाऊ कोल्हे व भगवान कोल्हे या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे या पावसाने मोठे नुकसान केले आहे . कोल्हे बंधुची 2 एकर सोयाबीन खरिपात लवकर पेरणी केल्याने परिपक्व होत काढणीला आली होती . पाऊस सुरू होण्यापूर्वी या शेतकऱ्याने सोयाबीन कापणी करून शेतात ठेवली होती . वेळेवर मजूर न भेटल्याने कापलेली सोयाबीनचा गंजी करत मळणी करणे कोल्हे बंधुना जमले नाही . काढणीनंतर दुसरे दिवशी पासूनच तशी संधीही पावसानी त्यांना दिली नाही . सतत होत असलेल्या पावसाने या शेतकऱ्यांची सोयाबीन पावसाने भिजून आता कुजून जात आहे .

सोयाबीनच्या शेंगांमधून अंकुर

गौंडगाव येथील कोल्हे बंधु प्रमाणेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मधून वाचलेले सोयाबीन काढणी अवस्थेत होते , परंतु सातत्याने पडणार्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा मधून आता अंकुर बाहेर येऊ लागले आहेत . विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची उशिरा पेरणी झाली अशा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या हिरव्या शेंगा मधूनही अंकुर बाहेर येत असल्याच्या तक्रारी आता शेतकऱ्याकडून येत आहेत .

विमा प्रतिनिधी बांधावर कधी ?

भगवान कोल्हे यांनी सोयाबीनच्या नुकसानी संदर्भात पीक विमा कंपनीला 72 तासाच्या आत तक्रार दाखल केली असून तक्रार दाखल केल्यानंतर आज पर्यंत विमा कंपनीचा प्रतिनिधी त्यांच्या शेताकडे फिरकला नाही .सदरील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तक्रार करण्यास वेळ मर्यादा असेल तर झालेल्या नुकसानाची ची पाहणी ,पंचनामा व नुकसान भरपाई ही पण काल मर्यादेमध्ये भेटायला पाहिजे ! अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

सोयाबीनला आलेला भाव आपल्या पदरात पडेल आणि त्यातूनआर्थिक उभारी मिळेल अशी स्वप्न उराशी बाळगलेल्या मुंजाभाऊ कोल्हे यांच्यासह परभणी मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्वप्ने व गणिते कोलमडून पडले आहेत . त्यामुळे स्थानिक शेतकरी आता परतीच्या पावसाला अक्षरशः वैतागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमधून यंदा ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी होत आहे.