हॅलो कृषी ऑनलाइन : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. मात्र सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांकडे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मृग नक्षत्राच्या अगोदरच पावसानं जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. इतर गळीत धान्य पीक कमी होत असताना सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. मात्र एकीकडे बियाणे तुटवडा गुणवत्तेचा प्रश्न असताना बियाणे दरात वाढ शेतकऱ्यांसाठी अडचणीची आहे. त्याचं चढ्या दराने विक्री करून कोंडी केली जात आहे.
विक्रेते छापील किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करत आहेत. मात्र व्यवहारात बिले छापील किमतीची दिली जात आहेत. तर त्यापेक्षाही अधिक दर घेतले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही शेतकरी पुढे येऊन बोलत नसल्याचा विक्रेते फायदा घेत असल्याचा शेतकऱ्यांमध्ये सूर आहे. नाव न घेण्याच्या अटीवर एका शेतकऱ्यांना सांगितलं की निफाड येथे एका खासगी कंपनीचे बियाणे 3450 रुपये 30 किलो बॅग प्रमाणे असताना विक्रेते 3800 ते 4000 प्रमाणे विक्री करतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पुन्हा दरवाढीच्या या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर बियाणे वेळेवर भेटत नसल्याची तक्रार देखील शेतकर्यांनी केली आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असताना देखील अनेक जण साठा संपला असल्याचा कारण काढत टाळाटाळ करत आहेत. आणि चढ्या दराने विक्री करत आहेत असंही शेतकऱ्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.