Success Story : रेशीम शेतीतून साधली प्रगती; शेतकऱ्याची 22 दिवसांमध्ये 85 हजारांची कमाई!

Success Story Of Sericulture Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेतीला करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना देखील राबविल्या जात आहेत. यामध्ये अनेक शेतकरी सरकारच्या रेशीम शेतीच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन, रेशीम शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून केवळ तीन आठवड्यांमध्ये 85 हजार 754 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

किती मिळाले उत्पन्न? (Success Story Of Sericulture Farming)

अमित अरुण वरघणे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील वाहितपूर येथील रहिवासी आहेत. शेतकरी अमित वरघणे (Success Story) यांनी एप्रिल महिन्यातील कडक उन्हाळ्यात एक एकरातील तुती पाल्याचा वापर करुन, 150 अंडीपुंजाचे चॉकी घेऊन फक्त 22 दिवसांमध्ये 161.800 किलोग्रॅम कोष उत्पादित करून 85 हजार 754 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. उन्हाळ्यातील रेशीम शेतीची बॅच यशस्वी (Success Story) करण्यासाठी कीटक संगोपनगृहाभोवती बारदाने लावून, तसेच शेडच्या टिनावर रेनगन पाइप बसवून तापमान आर्द्रता नियंत्रण करण्याचे काम त्यांनी केले. ज्याचा त्यांना खूप फायदा झाला असल्याचे ते सांगतात.

कमी कालावधीत भरघोस नफा

अमित वरघणे यांनी 2022-23 मध्ये एक एकरामध्ये तुती लागवड केली. पहिल्याच वर्षी शेड बांधकाम करून यशस्वी बॅचेस घेतल्या. कमी कालावधीमध्ये इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती ही एकमेव शाश्वत शेती आहे. याची प्रचिती येताच पुन्हा एक एकर तुती लागवड वाढवून दोन एकरमध्ये सध्या त्यांचा रेशीम उद्योग सुरू आहे. ज्यातून त्यांना प्रत्येक बॅचला मोठा नफा मिळत असल्याचे ते सांगतात.

रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन

दरम्यान, कडक उन्हाळ्यामध्येही पिकाचे सुनियोजित व्यवस्थापन केले तर कमी दिवसांतही जास्त उत्पादन होऊ शकते हे अमित वरघणे यांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या मागे न लागता रेशीम शेतीच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शेतकरी अमित वरघणे यांनी केले आहे.