Success Story : पुण्यात विदेशी ‘पैशन फ्रुट’ची लागवड; एकरी 4 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी (Success Story) आता पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पांडुरंग बराळ यांनीही असाच अनोखा प्रयोग (Success Story) करून पाहिला आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे. पांडुरंग यांनी पारंपरिक शेतीचा नाद सोडत ब्राझिलियन पैशन फ्रुटची लागवड केली आहे. त्यातून त्यांना एकरी 4 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

पांडुरंग बराळ हे इंदापुर तालुक्यातील कचरवाडी गावचे रहिवासी असून, ते नेहमीच आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. भाजीपाला आणि डाळींबाच्या लागवडीतून नुकसान झाल्याने, त्यांनी जांभूळ, सीताफळ, पपई, आणि पेरू यांसारखी फळ पिकेही घेतली. मात्र आसपासच्या शेतकऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणात ही फळ पिके घेण्यास सुरुवात केल्याने त्यांना अपेक्षित फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्यातील काहीतरी नवीन करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघून नवीन तंत्रज्ञानाआधारित पिकाची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांना राजस्थानच्या किसनगढ येथील एक शेतकरी पैशन फ्रुटची लागवड करत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन पैशन फ्रूटच्या शेतीबाबत माहिती मिळवली. तिथे त्यांना अपेक्षित माहिती मिळाली नाही. मात्र पांडुरंग यांनी पैशन फ्रूट लागवडीचा निर्धार मनात पक्का केला होता.

130 ते 150 रुपये किलो दर (Success Story Of Passion Fruit Farmer)

या पिकासाठी पांडुरंग यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा खूपच अल्प प्रमाणात वापर केला. पांडुरंग यांनी घरच्या घरीच बियाण्याच्या साहाय्याने रोपे तयार करून, 7 बाय 10 या अंतरावर एका एकरात या रोपांची लागवड केली. त्यानंतर चार महिन्यांनी त्यांच्या कष्टाला फळ येण्यास सुरु झाले आहे. सध्या त्यांच्या बागेतील पैशन फ्रूटची काढणी सुरु असून, ते पुणे आणि मुंबई येथील बाजारात आपल्या फळाची विक्री करत आहे. या ठिकाणी त्यांना 130 ते 150 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.

4 लाखांचा निव्वळ नफा

पैशन फ्रूट हे फळ वजनाने हलके असून, त्याचा रस मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर समस्यांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे या फळास उच्चभ्रू लोकांमध्ये मोठी मागणी आहे. पैशन फ्रूट हे फळ अमेझॉन आणि एलिट मॉलसमध्ये 250 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. पांडुरंग यांना तीन ते चार टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. ते सांगतात की, आतापर्यंत खर्च जाऊन त्यांना पैशन फ्रूटच्या विक्रीतून एकरात 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. आणि अजून काढणी सुरु असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.