Sugarcane Rate : पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; महामार्ग रोखला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, तामिळनाडूनंतर आता पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमधील संयुक्त किसान मोर्चा या संघटनेच्या मदतीने शेतकऱ्यांनी उसाला 380 रुपये प्रति क्विंटल ऐवजी (10 क्विंटल = 1 टन) 450 रुपये प्रति क्विंटल दर (Sugarcane Rate) देण्याची मागणी केली आहे.

ऊस दरवाढीच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी धानोली गावाजवळ जालंधर-नवी दिल्ली राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरला होता. त्यामुळे वाहनांच्या जवळपास 4 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पूर्व पदावर आणण्यासाठी पोलिसांना बराच अवधी लागला. सरकारकडून ऊस दरवाढीची अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतरच शेतकरी आपले आंदोलन थांबवतील. जोपर्यंत सरकार याप्रकरणी निर्णय घेत नाही तोपर्यंत महामार्ग सुरळीत केला जाणार नाही. असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.

सरकारचा कानाडोळा (Sugarcane Rate In Punjab)

ऊस दरवाढीसोबतच साखर कारखान्यांमध्ये एक खिडकी-एक प्रणाली, पुरामुळे आणि अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या ऊस उत्पादकांना नुकसान भरपाई, आणि यावर्षीचे साखर कारखान्यांचे गाळप सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी सरकारकडे या मागण्या लावून धरल्या आहेत. मात्र सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने रास्ता रोको करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

रेल्वे वाहतूक रोखणार

8 नोव्हेंबर रोजी संघटनांसह शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी आंदोलन नियोजित केले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेत मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्ग रोखून धरला. त्यातच आता प्रशासनाने 24 तासांचा अवधी मागत आंदोलन थांबण्यात यश मिळवले, मात्र सरकारकडून काही ठोस पावले उचलण्यात आली नाही तर 26 नोव्हेंबरपासून पुन्हा शेतकरी 3 दिवसीय आंदोलन करणार आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून रेल्वे वाहतूक रोखून धरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.