सलग तिसऱ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब ;रब्बी हंगामाला होणार फायदा .

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

गोदावरी नदीवर परभणी जिल्हात येणाऱ्या पाथरी तालुक्यातील तीनही उच्च पातळी बंधारे सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरल्याने येणाऱ्या रब्बी हंगामात पिकांना या पाण्याचा उपसा सिंचनासाठी वापर होणार असल्याने या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गोदाकाठच्या 23 गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे .

याशिवाय परभणी जिल्ह्यात या बंधाऱ्यात पुढे येणारे व गोदावरी नदीवर उभारण्यात आलेले खडका , डिग्रस उच्च पातळी बंधारे ही शंभर टक्के भरले असून मुळी उच्च पातळी बंधाऱ्या चे दरवाजे नादुरुस्त असल्याने हा बंधारा सोडला तर उर्वरित बंधाऱ्यांमधील पाण्याचा शेती सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे . खडका बंधाऱ्याचे पाणी परळी औष्णिक केंद्र साठी देण्यात येते त्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करण्यावर मर्यादा येते. जिल्ह्यातील शेवटचा उच्च पातळी बंधारा असणारा डिग्रस येथील बंधारा सर्वाधिक 44 दलघमी पाणी साठवण क्षमता करत असल्याने याही बंधाऱ्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो परंतु फेब्रुवारी नंतर नांदेड साठी या बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते .आजच्या लेखामध्ये जिल्ह्यातील सुजलाम-सुफलाम असलेल्या पाथरी तालुक्यातील पाणी साठवणीसह रब्बी हंगामाचा आपण आढावा घेऊया .

 पावसाने बंधारे फुल्ल…

पाथरी तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जुलै महिन्यापासूनच गोदावरी नदीवर उभारण्यात आलेले उच्च पातळी बंधारे यांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानंतर व गोदावरी नदीमध्ये जायकवाडीचे पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता . त्यामुळे यंदा गोदावरी नदीने दुथडी भरून दोन वेळा वाहती झाली . एकवेळ पात्राबाहेरही सिमोल्लंघन पहायला मिळाले. आता परतीच्या पावसाने उसंत घेतली असली तरी जायकवाडी धरणा मधून 1 हजार 48 क्युसेकने धरणाच्या मुख्य दरवाजामधून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने अधून-मधून तालुक्यातील ढालेगाव,तारूगव्हाण व मुद्गल उच्च पातळी बंधाऱ्यांमधून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येत आहे .ही परिस्थिती आणखी काही दिवस राहणार असली तरी त्यानंतर पाणी सोडणे बंद होईल .

सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठा

सद्यस्थितीत ढालेगाव उच्च पातळी बंधारा 13.50 दलघमी ,तारूगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये 15.04 दलघमी तर मुदगल उच्च पातळी बंधार्‍यामध्ये 11.36 एवढा जिवंत पाणीसाठा झाल्याने सध्या गोदावरी पात्र पाण्याने तुडुंब भरलेल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे .तसे पाहिले तर ढालेगाव उच्च पातळी बंधारा पाणीसाठवण क्षमता 14. 87 दलघमी ,तारूगव्हाण उच्चपातळी बंधारा 15. 40 दलघमी व मुदगल उच्च पातळी बंधाऱ्याची 11. 87 दलघमी पाणी साठवण क्षमता असून लवकरच पूर्ण क्षमतेने उ.पा बंधारे शंभर टक्के भरलेले असतील .

रब्बी पिकांसाठी पाणीसाठा

आता या पाणीसाठ्याचा रब्बी हंगामामध्ये अंदाजीत 24 हजार 800 हेक्टर वर क्षेत्रावर पेरणी होणाऱ्या तृणधान्य , गळितधान्य व कडधान्य व बागायती उस केळी इत्यादी पिकांना सिंचनाद्वारे चांगले उत्पादन घेण्यासाठी फायदा होणार आहे .याच बरोबर या बंधाऱ्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा अंतर्गत आठ गावातील 1 हजार 33 हेक्टर , तारूगव्हाण बंधारा शेजारील आठ गावातील 1050 हेक्टर तर मुदगल बंधारा शेजारील सात गावातील 892 हेक्टर अशा एकूण 3 हजार 75 हेक्टर शेती क्षेत्राला उपलब्ध पाणीसाठ्याचा फायदा होणार आहे .याशिवाय ढालेगाव उच्च पातळी बंधार्‍यातुन पाथरी शहराला पाणी पुरवठा होत असल्याने शहराचाही पाणी प्रश्न पुढील पावसाळ्यापर्यंत संपलेला असेल. दरम्यान जायकवाडी शंभर टक्के भरले असल्याने तालुक्यातील उर्वरित शेती क्षेत्राला पाटपाण्याने रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे खरिपात अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला पुढील काळात चांगले उत्पादन मिळेल असे आशावादी चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे .