…तर चिकन आयातीची परवानगी द्या  : पाशा पटेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साठी चार हजारांपर्यंत नियंत्रित करावा अशी मागणी करून पोल्ट्री ब्रीडस असोसिएशन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच जीएम सोया पेंड आयातीची परवानगी केंद्राकडे मागितली आहे. ही संघटना केंद्र शासनावर दबाव टाकून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणण्याचे कारस्थान करत आहेत. केंद्र सरकारने त्यांना सोयाबीन पेंड आयातीची परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे.

याबाबत बोलताना पटेल म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. त्याला दोन पैसे अधिक मिळणार हा त्याचा अधिकार आहे. पोल्ट्री वाले सरकारवर दबाव आणून चार हजार रुपयांपर्यंत सोयाबीनचा दर नियंत्रित करण्याचे कारस्थान करीत आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांनी परदेशातून आयात करून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणलं. असे पटेल यांनी म्हंटले आहे.

पोल्ट्री चा असो किंवा सोयाबीनचा शेतकरी हे सर्व सारखे आहेत पण सोयाबीन वाल्यांची जिरवण्यासाठी लॉबिंग कशासाठी केली जात आहे? अंड्याचे दर वाढले कोणी खरेदी केली नाही का? अंडे खायचे कोणी सोडले नाही आता सोयाबीनचा दर वाढला तर तुम्हाला का त्रास होत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अंगावर घेऊ नका ते महागात पडेल. भाव नाही म्हणून सोयाबीन टप्प्याटप्प्याने बाजारात येत आहे. पोल्ट्री वाल्यांनी मस्ती केली तर सोयाबीनच बाजारात आणू नका असं आवाहन केलं जाईल. तुमचे जगणे मुश्कील होईल, विषाची बीज पेरू नका. शेतकऱ्यांच्या ताटात माती करू नका असं आवाहन पाशा पटेल यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण ?

संपूर्ण राज्यभरातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा केली जात आहे. असं असताना दुसरीकडे मात्र ‘ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन’ ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल असायला पाहिजे असे म्हणत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या पत्रात सोयाबीनला प्रति क्विंटल 2950 रुपये हमी भाव आहे. परंतु बाजारात सध्या सोयाबीनला 6000 ते 6200 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल असायला पाहिजेत म्हणून केंद्र सरकारने सोयाबीनमधील दरवाढ रोखण्यासाठी पावले उचलावीत असं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी पेचात अडकलेल्या शेतकऱ्याला आणखीनच पिचण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उठवला जात आहे.