कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काही दिवस ओसरण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला असून राजस्थानच्या जैसलमेर पासून उदयपुर मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रातून गोंदिया भुवनेश्वर ते बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राचा मध्यभागात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किलो मीटर उंचीवर परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र मध्यप्रदेश परिसरावर असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. उपसागरात शनिवारपर्यंत नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रविवार पासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोकण उत्तर महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात हलक्‍या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार नाशिक या ठिकाणी तर कोकणात पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.