हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Weather Update) झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. तर कोकण किनारपट्टीसह, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. तर आगामी 24 तासांमध्ये राज्यात अनेक भागात पाऊस होऊ शकतो. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
मागील 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Weather Update) बरसताना दिसत आहे. यात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेतील गारठा वाढल्याचे पहायला मिळाले. या बदललेल्या वातावरणाचा भाजीपाला पिके, कांदा, द्राक्ष तर कोकणातील आंबा, काजू या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन भरात असताना झालेल्या पावसामुळे फळ पिकांचा मोहोर गळून पडला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही द्राक्षासह रब्बी कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चक्राकार स्थिती कायम (Weather Update Today 10 Jan 2024)
दक्षिण-आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असून, परिणामी राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. या चक्राकार वाऱ्यांमुळे 11 जानेवारीपर्यंत देशासह राज्यात पाऊस कायम राहणार आहे. आजही दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ही वाऱ्यांची चक्राकार स्थिती दक्षिण श्रीलंकेपासून दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यापर्यंत पसरली आहे. याशिवाय मध्य प्रदेशासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांच्या काही भागातही आज पाऊस होण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.