हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल (Weather Update) होताना पाहायला मिळतोय. उत्तरेकडील हिमालयीन राज्यांमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ होऊन, थंडीचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे.
‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update Today 28 Jan 2024)
हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील तीन ते चार दिवस पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी, दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि वरच्या भागात हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय 31 जानेवारी 2024 पासून पुन्हा पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर-पश्चिम भारताच्या लगतच्या मैदानांवर आणखी एका पश्चिमी चक्रावाताचा परिणाम होण्याची शक्यता असून, हवामानात बदल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ज्यामुळे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, चंदीगड आणि बिहारमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
किमान तापमानात वाढ होणार
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचे असू शकते. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान,मागील 24 तासांमध्ये धुळे येथे राज्यातील निच्चांकी 6.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. निफाड येथे 8.2, जळगाव येथे 9.9 आणि मालेगाव येथे 10 अंश तापमान नोंदवले गेले आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान 10 ते 21 अंशांच्या दरम्यान आहे. त्यात काहीशी वाढ होऊन, गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.