हुडहुडी…! पावसाची उघडीप , राज्यातील तापमानात घट पारा 14.4 अंशांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उघडीप देताच राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज दिनांक 9 रोजी राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. तर राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश असून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी 20 अंश पार गेलेले तापमान पुन्हा 16 अंश आणि त्यापेक्षा खाली घसरले आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्यामुळे पहाटे गारठा वाढला असून काही भागात धुके पडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी महाबळेश्वर आणि औरंगाबाद येथे नीचांकी 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर रत्नागिरी इथे उच्चांकी कमाल 34.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

कमी दबाचे क्षेत्र किनाऱ्यापासून दूर

पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार तीव्र कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकू लागले आहेत. ही प्रणाली मुंबईपासून 840 किलोमीटर तर गोव्यापासून 800 किलोमीटर नैऋत्येकडे आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात आज दिनांक 9 रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून पूर्व किनाऱ्याकडे येतात त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत म्हणजे तारीख अकरापर्यंत ही प्रणाली उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत.