मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट तर कोकणासह काही भागात अवकाळीचा तडाखा ; पहा कसे असेल आज हवामान ?

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या मराठवाडा, विदर्भात सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सांगली सातारा ,कोल्हापूर , सिंधुदुर्ग या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर विदर्भात देखील पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे. येत्या 48 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

पुण्याचेही तापमान ४० अंशांच्या वर
दरम्यान मागील काही दिवस पुण्यातील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि त्या आसपास होते मात्र दिनांक ६ एप्रिल रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार पुणे आणि आसपासच्या भागात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी पुण्यातील शिवाजीनगर भागात ४०. १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील कामशेत चाळीस पॉईंट आठ, धायरी ४० .6 , पिंपरी-चिंचवड 41.5 ,पुणे 42 पॉईंट चार ,जुन्नर चाळीस पॉईंट सात असे तापमान पुण्यातील काही भागात नोंदवण्यात आले आहे. तर दिनांक ६ एप्रिल रोजी अकोला येथे सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

देशातल्या इतर राज्यातही तापमानात वाढ
दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान, दक्षिण हरियाणा-दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याची माहिती भारतीय हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.