पुढच्या हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही साखर कारखाना चालवू देणार नाही : राजू शेट्टी

Raju Shetti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानीकडून सध्या राज्यामध्ये ‘बळीराजा हुंकार’ यात्रेचे आयोजन केले जात आहे. आज कराड येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी पुन्हा एकरकमी एफआर पी चा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले पुढच्या हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही साखर कारखाना चालवू देणार नाही. जूनपासूनच या आंदोलनाची तयारी आम्ही करीत आहोत. कारखानदारांनी दोन तुकड्यात एफआरपी जाहीर करून कारखाना सुरू करून दाखवावेत , असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत किमान समान कार्यक्रमाच्या मुद्यावरून गेलो होतो. मात्र, काही फरक पडत नसल्याने आम्ही बाहेर पडलो. राज्य सरकारने एकरकमी एफआरपी देणे गरजेचे होते. केंद्राने केलेले कायदे रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसतो असे शेट्टी यांनी सांगितले आहे.

म्हणूनच हे सगळे राजकीय भोंगे वाजतायत..
शिवाय महागाईचा आगडोंब उसळला आहे त्यावर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इंधनासह अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्यसरकारच्या बाबतीत बोलायचे झाले तर कोरोनाच्या काळात मंत्र्यांवर कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले आणि दुसरीकडे सामान्य जनता टाचा फोडून फोडून मेली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या हे सर्व सावरण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. केंद्राच्या महागाईवर चर्चा नको , राज्य सरकारच्या अपयशावर चर्चा नको म्हणूनच हे सगळे राजकीय भोंगे वाजतायत.. असे म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.