रब्बी पिकांची पेरणी करताय ? मग ही बातमी वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून आता शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध लागले आहेत. राज्यात मुख्यत्वे हरभरा,ज्वारी,करडई, अशा पिकांची पेरणी रब्बी हंगामासाठी केली जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

१) हरभरा : बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश (109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 12 किलो युरिया किंवा 54.25 किलो युरिया + 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

२) करडई : बागायती करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे (पेरणीच्या वेळी 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 31 किलो युरिया किंवा 65 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी द्यावे व पेरणी नंतर एक महीन्यानी 65 किलो युरिया द्यावा).

३) हळद : हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

४)ऊस : पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

error: Content is protected !!