हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाचा (आयएमडी) अंदाज (Weather Update) तंतोतंत खरा ठरला असून, शनिवारी (ता.10) सायंकाळच्या सुमारास यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना गारांसह झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जवळपास 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या बोराच्या आकाराच्या गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या तीनही जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके हातची गेली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दुसऱ्यांदा गारांच्या पावसाचा तडाखा (Weather Update) बसला आहे.
‘या’ जिल्ह्यांना गारांचा तडाखा (Weather Update Today 11 Feb 2024)
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात विरखेड, वातखेड, घरफळ, गोंधळी या गावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारा (Weather Update) पडल्या. तर अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्यालाही अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली. याशिवाय वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुक्यात देखील शनिवारी दुपारच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. दुपारच्या सुमारास झालेल्या या गारांच्या पावसामुळे देवळी तालुक्यातील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात गारांच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
आज कुठे कोसळणार पाऊस?
पुढील 3 ते 4 दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी देखील या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
रब्बी पिकांचे नुकसान
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या संकटातून राज्यातील शेतकरी सावरतो न सावरतो? त्यात आता पुन्हा रब्बी हंगामाच्या शेवटाला गारांच्या पावसाने तडाखा दिला आहे. ज्यामुळे या तीन ही जिल्ह्यात गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सध्या या जिल्ह्यांमध्ये तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु असल्याने, ढिगाऱ्यात झाकून ठेवलेल्या तुरीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आधीच उत्पादन कमी त्यात नुकसानीचा सामना करावा लागत आहे.