हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या पावसाचे वातावरण (Weather Update) तयार झाले असून, पुढील 48 तासांमध्ये राज्यातील प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यातिल अनेक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तरेकडील नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याशिवाय मुंबई आणि संपूर्ण कोकण परिसरात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) व्यक्त केला आहे.
विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’ (Weather Update Today In Maharashtra)
हवामानाने विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशीम, अकोला या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट अर्थात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसह नागरिकांनी पावसाच्या वातावरणात बाहेर पडू नये. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’
संपूर्ण मराठवाड्यात आज हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस (Weather Update) होऊ शकतो. तर उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे आता काढणी सुरु असलेल्या हळद पिकासह गहू, हरभरा या रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. योग्य ठिकाणी ढिगारे मारून झाकून ठेवावेत. असे आवाहनही करण्यात आले आहे.
परिणामी, राज्यात आता सकाळच्या सुमारास थंडी, दुपारच्या सुमारास उन्हाची ताप तर दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो. मागील 24 तासांमध्ये राज्यातील किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. निफाड (नाशिक) या ठिकाणी 5 अंश तर धुळे येथे 9.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. याउलट कमाल तापमानातही घट नोंदवली गेली आहे. मागील 24 तासांमध्ये सोलापूर या ठिकाणी 36 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित राज्यातील कमाल तापमान 35 अंशाहून खाली घसरले आहे.