हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update) जारी केलेल्या अंदाजानुसार, सोमवारी (ता.26) संध्याकाळच्या सुमारास जळगाव, बुलढाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या काही भागांना गारपिटीसह जोरदार पावसाने तडाखा दिला. तर तिकडे गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
‘या’ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट (Weather Update In Maharashtra)
दरम्यान, आज (ता.27) बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अशा विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही अनेक ठिकाणी ढगांच्या गडगटासह पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे.
कुठे झालाय गारपिटीसह पाऊस
- जळगाव जिल्हा – भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे आणि चाळीसगाव तालुक्यातील वरखेड, वाघडू, करगाव, अंधारी, पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी, ओढरे या गावांमध्ये गारपिटीसह तुफान पाऊस झाला आहे.
- नाशिक जिल्हा – मनमाड आणि आसपासच्या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस.
- जालना – भोकरदन व जाफराबाद तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. वीज कोसळून दोघांचा मृत्यू.
- बुलढाणा – जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, जळगाव, जामोद, नांदुरा तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान.
- छत्रपती संभाजीनगर – सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान.
- अकोला – अकोला जिल्ह्यातील बाळापुर, तेल्हारा आणि अकोट तालुक्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.
- गोंदिया – अतिदुर्गम भाग असलेल्या चीचगड परिसरामध्ये सोमवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
- वर्धा – आष्टी, कारंजा तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
- हिंगोली – दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील कान्हेरगाव नाका, कान्हारखेडा, कलबुर्गा, फाळेगाव या भागात जोरदार पाऊस झाला.
- चंद्रपूर – जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा आणि चिमूर या 5 तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे.
वीज पडून दोघांचा मृत्यू
अकोला जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अकोलादेव, टेंभूर्णी, भारज, काळेगाव, नांदखेडा अनेक गावांना सोमवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. तर अकोला जिल्ह्यातील कुंभारी या गावातील पल्लवी विशाल दाभाडे (वय 19) या महिला शेतकऱ्यासह सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड (वय 38) या दोघांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे.
रब्बी पिकांचे मोठे नुकसान
या अवकाळी पावसामुळे (Weather Update) वरील सर्वच जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, बाजरी, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागांमध्ये शेडनेटच्या माध्यमातून घेतलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. तर काही ठिकाणी गारांचा खच पडला होता. परिणामी, पावसाच्या माऱ्यामुळे काही भागांमध्ये शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या होत्या. दरम्यान, गारपिटीसह झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून, आर्थिक मदतीचा हात द्यावा. अशी मागणी या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.