हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात सातत्याने वातावरणात बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अशातच आणखी दोन दिवस देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बलुचिस्थान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांमध्ये 6 आणि 7 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिकडे आसाम, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्येही आज पावसाची शक्यता कायम आहे. असेही हवामान विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
निफाडचा पारा 6.6 अंशांवर (Weather Update Today 6 March 2024)
याउलट महाराष्ट्रात किमान तापमानातील घट (Weather Update) कायम असून, निच्चांकी तापमानामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर राज्यातील अन्य भागातही किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस तर धुळे या ठिकाणी 7.4 अंशांपर्यंत किमान तापमानात घट झाली आहे. तर उर्वरित राज्यातही किमान तापमान हे 13 ते 19 अंशांपर्यंत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पहाटेच्या वेळी हवेतील गारवा वाढला आहे.
कमाल तापमानात स्थिर
मागील आठवड्यात 39 अंशापर्यंत पोहचलेला कमाल तापमानाचा पारा सध्या 35 अंशांहून खाली घसरला आहे. ज्यामुळे सध्या काही भागांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये सोलापूर येथे 36.8 अंश, चंद्रपूर येथे 36 अंश, तर सातारा येथे 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ही तीन जिल्हे वगळता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा हा 35 अंशांच्या खाली नोंदवला गेला आहे. राज्यात उर्वरित जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे.