हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळतोय. देशाच्या वायव्य भागातून प्रवेश करत पश्चिमी चक्रीय वारे पूर्वेकडील बंगालच्या उपसागरापर्यंत पोहचले आहेत. ज्यामुळे सध्या पश्चिम बंगालपासून आंध्रप्रदेशचा किनारपट्टी भाग आणि तामिळनाडू ते विदर्भाच्या काही भागापर्यंत सौम्य कमी दाब पट्टा तयार झाला आहे. परिणामी, राज्यातील पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी (Weather Update Today 16 March 2024)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज प्रामुख्याने गोंदीया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाची (Weather Update) शक्यता आहे. विशेष म्हणजे या पावसादरम्यान जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय विदर्भ-मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. प्रामुख्याने पुढील बुधवारपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पावसासोबतच उन्हाची काहिली
राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाची काहिली कायम असून, मागील 24 तासांमध्ये अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 37 ते 40 अंशादरम्यान कायम आहे. नाशिक, रत्नागिरी हे दोन जिल्हे वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या कमाल तापमान 35 अंशांहून अधिक आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाच्या वातावरणासोबतच उन्हाची प्रचंड ताप देखील पाहायला मिळत आहे. याउलट सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान देखील 10 अंशांहून अधिक आहे. अर्थात कमाल आणि किमान तापमानात अल्प घट झाली आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही तापमान वाढ
दरम्यान, सध्या महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण भारतासह पूर्व, उत्तर, पश्चिम भारतात देखील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. या वाढत्या तापमानासोबतच झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेशचा काही भाग, उत्तरप्रदेशच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.