हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक शेतीतील (Natural Farming) उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे, असे राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारचा कृषी व शेतकरी कल्याण विभाग, राज्याचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती (Natural Farming)’ या विषयावरील यशदा येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
करतायेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती (Natural Farming 25 Lakh Hectare In Maharashtra)
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती (Natural Farming) मिशनअंतर्गत राज्यातील किमान 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक शेतीचे धोरण अंमलबजावणीकरिता लोकप्रतिनिधींचेही सहकार्य घेण्याचा प्रयत्न आहे. नैसर्गिक शेतीचे फायदे, पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीतील उत्पादनाला बाजारपेठ याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. असेही कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी म्हटले आहे.
रसायनमुक्त शेतीसाठी प्रयत्नशील
राज्यातील जास्तीत जास्त क्षेत्र रसायनमुक्त आणि विज्ञानयुक्त अशा नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. सेंद्रिय शेतीचे शास्त्रोक्त ज्ञान मिळायला हवे. नैसर्गिक शेती ही केवळ शेती नाही तर ते एक शास्त्रोक्त तत्त्वज्ञान आहे. याचा अवलंब करणे आवश्यक आहे. असेही कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी म्हटले आहे.
8 राज्यातील शास्रज्ञ, शेतकरी उपस्थित
या कार्यशाळेस राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दिव आणि लक्षद्वीप या 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शास्त्रज्ञ, अधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते. याशिवाय कृषी व शेतकरी विभाग भारत सरकार व एकात्मिक पोषण व्यवस्थापनच्या उपसचिव रचना कुमार, सहसचिव डॉ. योगिता राणा, आयसीएआरचे सहायक महासंचालक एस. के. शर्मा, डॉ. राजबीर सिंग, कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे, संजय पाटील उपस्थित होते.