हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकरी, व्यापारी, आणि खरेदीदारांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-नाम’ची (E-NAM) सुरुवात केली आहे. या राष्ट्रीय कृषि बाजार योजना अर्थात ई-नाम प्रणालीमध्ये राज्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांमध्ये (E-NAM) प्रथम क्रमांक मिळाला आहे.
देशातून 8 बाजार समित्यांची निवड (E-NAM Baramati APMC)
भारत सरकारच्या ई-नाम (E-NAM) योजनेमध्ये जास्तीतजास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण विभागाने कृषी व्यापार संघातर्फे लघु चित्रपट बनविला जाणार आहे. त्याकरिता देशातून 8 राज्यांतील आठ बाजार समित्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती म्हणून पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीची निवड झाली आहे. त्यानुसार, डीडी किसान चॅनलतर्फे बारामती बाजार समितीची विविध उपक्रमांची शूटिंग करण्यात आली आहे. डीडी किसान चॅनल ई-नाम प्रणालीला साहाय्य करणार आहे. त्यामध्ये शेतकरी, एफपीओ, व्यापारी, ई-नामच्या यशस्वी गोष्ट, चित्र प्रसारण करण्यात येणार आहे.
61 हजार शेतकरी नोंदणीकृत
बारामती मुख्य मार्केट यार्डमध्ये ई-नाम प्रणालीमध्ये शेतमालाची गेट एन्ट्री 1 लाख झाली असून, 7 लाख क्विंटल आवक नोंदविण्यात आली आहे. शेतकरी नोंदणी 61 हजार 830 केली आहे. पैकी केवायसी घेऊन 1196 कायमस्वरूपी शेतकरी, तसेच 44 खरेदीदार, 42 आडते आणि राज्यातील रेशीम कोष खरेदीदार 7 आणि तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील 7 खरेदीदार लायसन्सधारक नोंदणी झालेली आहेत.
2022 पासून सात कोटींची उलाढाल
बारामती बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदीदार ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये सहभागी होत आहेत. रेशीम कोष लिलाव ऑनलाइन घेतले जातात. यामध्ये शेतकरी नोंदणी, गेट एन्ट्री, कोषाची गुणवत्ता तपासणी, सेल रेशो, त्यानंतर ऑनलाइन लिलाव आणि अक्सिक्स बैंकमार्फत ई-पेमेंट केले जाते. सन 2022 पासून 1700 शेतकऱ्यांची 131 टनांची कोष विक्री होऊन साधारण 7 कोटींची उलाढाल झाली आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रामध्ये ई-नाम प्रणालीद्वारे 100 टक्के ऑनलाइन पद्धती राबविण्यात येत असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.