Heat Wave : उष्माघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान!

Heat Wave Effects Poultry Business
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आला आहे. परंतु, उष्णता (Heat Wave) काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. उकाड्यामुळे सर्वजण हैराण झाले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास जाणवत आहे. या उष्माघाताच्या झळा आता शेतकऱ्यांसोबतच पोल्ट्री उत्पादकांना देखील बसत आहे. कारण उष्माघातामुळे राज्यभरात कोंबड्या मृत्यू पावत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, उष्माघातामुळे (Heat Wave) सध्या शेतकऱ्यांसोबतच पोल्ट्री उत्पादक चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकाच दिवसात 1200 कोंबड्यांचा मृत्यू (Heat Wave Effects Poultry Business)

सांगली जिल्ह्यात उष्माघातामुळे (Heat Wave) शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांचे पॉल्ट्री फार्म आहे. त्यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण 4200 पक्ष्यांपैकी 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अगोदरच अवकाळीमुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता जोडधंद्याला देखील उष्णतेचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती झाली निर्माण झाली आहे.

पोल्ट्री व्यवसायही धोक्यात

वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. भर उन्हाळ्यात अचानकपणे लोडशेडिंग होत आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण वाढले आणि अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेडधारकांचे धाबे दणाणले आहेत. कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचे यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकरी शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशु आणि कुक्कुटपालन करतात. मात्र, अवेळी पडणारा पाऊस, वातावरण बदलामुळे शेती व्यवसायासह हे व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यापूर्वी देखील उष्मघातामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता वाढत्या उन्हाचा परिणाम पोल्ट्री फार्मवर होत आहे. कोंबड्यांच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.