Leaf Reddening In Cotton: कापूस पि‍कात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, असे करा व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील बऱ्याच वर्षापासून कपाशीवर लाल्या (Leaf Reddening In Cotton) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे कपाशीचे उत्पन्न (Cotton Production) जवळजवळ 20 ते 25 टक्क्यांनी घटते. लाल्या रोग प्रामुख्याने जमिनीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो किंवा त्याला अन्य कारणेही आहेत जसे पिकाची फेरपालट (Crop Rotation) न करणे, शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणे, हलक्या किंवा मुरमाड जमिनीत पिकाची लागवड करणे, रसशोषक किडींचा (Sucking Pest) प्रादुर्भाव इत्यादी.

लाल पाने (Leaf Reddening In Cotton) हा एक कपाशी पि‍कातील (Cotton Crop) विकार असून प्रामुख्याने जास्त उत्पादन देणार्‍या कपाशीमधे आढळून येतो. झाडाच्या पानातील हरितद्रव्य प्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करून आंतरप्रक्रियेने ते झाडाच्या विविध भागात पोहचवल्या जाते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या व आंतरप्रक्रियेने ते झाडाच्या विविध भागात पोहोचवण्याच्या नैसर्गिक क्रियेमधे विविध कारणांमुळे बाधा उत्पन्न होऊन पानातील हरित द्रव्याचे प्रमाण कमी हाते व त्याची जागा अॅन्थोसायनीन हे रंग द्रव्य घेते आणि या द्रव्यामुळेच पानाला लाल रंग (Leaf Reddening In Cotton) येतो.

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके ही लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. सोबत काही ठिकाणी आकस्मिक मर रोगाचे (Parawilt In Cotton) प्रमाण काही भागात दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

लाल्या रोगावर करावयाच्या उपाय योजना (Control Of Leaf Reddening In Cotton)

  • शेतकरी बांधवानी लवकरात लवकर पि‍काला खतमात्रा द्यावी.
  • शेतात पाणी साचल्यास त्वरित चर काढून साचलेले पाणी बाहेर काढावे.
  • 13:00:45 किंवा 19:19:19 चे 5 ग्रॅम/लिटर किंवा नॅनो युरीयाची 4 मिली/लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी.
  • मॅग्नेशियम ची कमतरता दूर करण्यासाठी 1 टक्का मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी.
  • कपाशीला बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
  • कपाशीवर मावा तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रभाव दिसत असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी 20 मिली फिप्रोनील, किंवा 10 मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन(25 एस सी ) प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आकस्मिक मर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसल्यास उपाय योजना

दीड किलो युरिया + दीड किलो पोटॅश 100 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी त्या नंतर 8 ते 10 दिवसांनी 2 किलों डी ए पी 100 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण 50 ते 100 मिली झाडाजवळ द्यावे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम + युरिया 10 ग्रॅम प्रति लिटर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी.