सोयाबीन मोझॅकला असे करा नियंत्रीत ; वाचा कृषी विभागाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे . त्यामुळे देशात मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांक लागत महाराष्ट्र हे सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून पुढे आले आहे . खरिप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणाऱ्या या पिकांमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.परंतु या पिकांमध्ये येणारे रोग या संदर्भात शेतकऱ्यांना नेमकी माहिती नसल्याने त्याच्यावर योग्य उपाययोजना न केल्याने उत्पादनात घट तर चुकीच्या औषधांची फवारणी केल्याने खर्चात वाढ होते.आज आपण सोयाबीन पिकातील येणाऱ्या मोझॅक विषयी माहिती घेणार असून कृषी विभागाने यावर सांगीतलेल्या उपाय योजना व कृषी सल्ला पाहणार आहोत. सोयाबीनमध्ये 2 प्रकारचे मोझॅक येतात एक पिवळा मोझॅक व दुसरा सोयाबीन मोझॅक

१)पिवळा मोझॅक

पिवळ्या मोझॅकमध्ये पानाला हळदीसारखा पिवळेपणा येतो. हा पांढ-या माशीमार्फत प्रसारित होतो. तुम्ही मॉझॅक फरशी बघितली असेल. त्यावर छोटे छोटे ठिपके रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. त्या ठिपक्यांचा आकारही निश्चित नसतो. अशी लक्षणे पानावर दिसतात. तेव्हा मोझॅक हा रोग झाला आहे असे समजावे. हिरवट पिवळे, पिवळसर ठिपके एकमेकांत मिसळलेले असतात, रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. असे सुरूवातीला एखाद दुस-या पानावर दिसते व बाकीची पाने हिरवी असतात. त्यानंतर नवीन येणारी पाने पिवळ्या रंगाची असतात.

२)सोयाबीन मोझॅक

सोयाबीन मोझॅकमध्ये पिवळेपणा जास्त दिसत नाही. साधारण पिवळी छटा पानावर येते. पानं कुस्करल्यासारखी किंवा वेडीवाकडी होतात. पानाच्या कडा खालच्या बाजूला वळतात. पानांचा आकार घटतो आणि सोयाबीन पिकाची उंचीसुद्धा घटलेली दिसून येते. हा बियाण्यामार्फत प्रसारित होतो.

अन्नद्रव्य कमतरता 

याशिवाय लोह, जस्त नत्र, मॅग्नेशियम, पोटॅश इ. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेही पाने पिवळी पडतात. यामुळे झाडाची वाढ खुंटलेली दिसून येते.

सोयाबीन वरील मोझॅक नियंत्रण

–या रोगाचा प्रसार पांढरी माशी करते. रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल तर शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करावीत.
— पिवळे चिकट सापळे शेतात हेक्टरी 15-16 लावावेत.
–पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा.
–प्रसार पांढरी माशी करत असल्यामुळे इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल या कीटकनाशकाची 2.5 मिली किंवा थायमिथॉक्झाम 25 डब्लू जी 2 ग्रॅम किंवा इथोफेनप्रोक्स 20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.