दिलासादायक ! राज्यात पाऊस करतोय कमबॅक, पहा तुमच्या जिल्ह्यात कधी करणार एंट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. आता हवामान विभागानं राज्यात पाऊस चांगला कमबॅक करेल असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर दाट ढग जमा झाले आहेत. तसेच महाराष्ट्रावरही ढग जमा झाले आहेत.  त्यामुळे पुढील ४८ तासात राज्यात पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान तज्ञ् के. एस . होसाळीकर यांनी दिली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट

महाराष्ट्रात आज प्रामुख्याने पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 28 ऑगस्टला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.