ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची पावसामुळे धांदल, रत्नागिरीसह राज्यात अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाने जोरदार एंट्री केली आहे. राजधानी दिल्ली मध्ये तर जोरदार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान राज्यातही पावसाचा जोर कायम असून पुढील ४-५ दिवसात राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस आणि हवेच्या वरच्या थरात असलेली परस्परविरोधी वाहणाऱ्या वाऱ्यांची स्थिती या प्रणालीपूरक ठरल्याने गेल्या आठवड्यात राज्यात बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते 2 ते 8 सप्टेंबर या कालावधीत पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता राज्याच्या सर्वच विभागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाचा प्रमाण अधिक होतं

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

अशी असेल पावसाची स्थिती

दिनांक 12 रोजी हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. 13 रोजी हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. 14 रोजी हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.