APMC Market : अखेर नाशिकच्या 13 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु; शेतकऱ्यांना दिलासा!

APMC Market Starts In Nashik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लेव्ही संदर्भात प्रश्न पेटल्याने गेल्या 25 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे (APMC Market) कामकाज ठप्प होते. व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे कांदा व इतर शेतीमालाचे लिलाव बंद होते. राज्याच्या सहकार विभागाने व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतरही व्यापारी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सर्वच स्तरावर ओरड झाल्याने व्यापाऱ्यांनी अखेरीस बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यातील तेराहून अधिक बाजार समित्यांमध्ये (APMC Market) लिलाव प्रक्रिया आजपासून (ता.23) सुरु झाली आहे.

लेव्हीचा तिढा काय (APMC Market Starts In Nashik)

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लेव्हीचा तिढा कायम आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी 13 बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने नांदगाव, मनमाड वगळता इतर बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची विक्री सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता लिलाव सुरु झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, यापूर्वी लासलगांव बाजार समितीने 12 एप्रिल रोजी याआधीच आपले लिलाव सुरु केले आहेत.

काय आहे बाजार समिती वाद?

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनमार्फत 01 एप्रिल 2024 पासुन जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीतुन हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लासलगांवसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा, भुसार व तेलबिया ह्या शेतीमालाचे लिलाव तेव्हापासून बंद ठेवले होते. मात्र, आता हळूहळू बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले आहेत.

आजचे कांदा बाजारभाव

आज सकाळी लासलगाव-विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1545 रुपये तर चांदवड बाजार समितीत 1699 रुपये दर मिळाला. तसेच मुंबई – कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1700 रुपये दर मिळाला. पुणे -पिंपरी बाजार समितीत कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला आहे. तर कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला आहे.