हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी कापूस पेरणीची वेळ सुरू झाली आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधव आपल्या रिकाम्या शेतात पुढील पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. तुम्हालाही तुमच्या शेतात कापूस पेरायचा असेल तर आतापासूनच पेरणीची प्रक्रिया सुरू करावी.शेतकऱ्यांसाठी कापूस पेरणीसाठी 15 एप्रिल ते 15 मे ही योग्य वेळ मानली जाते. या काळात कापसाची पेरणी करून अधिक उत्पादन घेता येते, परंतु जास्त उष्णतेमुळे कपाशीची झाडे करपू लागतात.
तसे पाहिल्यास लवकर पेरणी करताना कपाशीच्या रोपाला उष्णतेपासून वाचवता येते. जेव्हा उष्णतेचा प्रकोप सुरू होईल तेव्हा कपाशीचे पीक तयार होईल आणि त्याच वेळी वेळेवर पाणी देऊन कपाशीला उष्णतेपासून वाचवता येईल.जर तुम्ही वालुकामय भागात रहात असाल तर कापसाची पेरणी लवकर करावी. यातून तुम्हाला अधिक फायदा होईल.
कापसासाठी जमीन तयार करणे
कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.
मशागत
कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.
पेरणी
बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.
वेगवेगळ्या भागासाठी, उदा.
१) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा
२) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा
३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा
याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे. बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.