राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. तर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असून किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी दिनांक 6 रोजी गोंदिया येथे कमीत कमी 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 33.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

पुणे गारठले
कालपासून पुण्यात दिवसभर ऊन असले तरी पहाटे आणि संध्याकाळनंतर चांगलाच गारवा जाणवत आहे. शिवाय पहाटे ते सकाळी ७ . ३० पर्यंत दाट धुके पसरलेले अनुभवायला मिळत आहे. आज सकाळी (७) पुण्यातील हवेली येथे कमीत कमी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

जवाद चक्रीवादळ निवळले
बंगालच्या उपसागरातील जवाद चक्रीवादळ निवळले असून सोमवार दिनांक 6 रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या किनार्‍यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे तर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनार्‍यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.