हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर एकीकडे उष्णतेचा कहर (Heat Wave) पाहायला मिळत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसहून अधिक असून, उष्माघातामुळे शेती पिकांनाच नाही तर पोल्ट्री उद्योगाला देखील मोठा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथे उष्माघाताने (Heat Wave) 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान (Heat Wave In Maharashtra)
दरम्यान, राज्यात सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे (Heat Wave) हजारो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथील सतीश वाघाये यांच्या पोल्ट्री फॉर्ममधील उष्माघाताने 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पोल्ट्री फॉर्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या वायफड गावातील एका पोल्ट्री फॉर्म मध्ये या कोंबड्या मृत्यू पावल्या आहेत. यामुळे पोल्ट्री फॉर्म व्यावसाईकांचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले आहे.
लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त
याशिवाय उष्माघातामुळे तब्बल बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी येथे देखील नुकतीच घडली आहे. सीताराम भगवान जाधव यांच्या यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण 4200 पक्ष्यांपैकी 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झाले यातच उष्णतेचे प्रमाण वाढले, यामुळे उष्माघाताने जाधव यांच्या कोंबड्या दगावल्याचे सांगण्यात आले आहे.
उष्माघाताचा पहिला बळी
तर विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या बोरगाव येथील कडुजी गोविंदा गुडदे या 65 व्यक्ती बकऱ्या चारण्याकरिता तपोवन शेत शिवारात गेले असताना उन्हाचा फटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा यावर्षीच्या उन्हाळ्यातील उष्माघाताचा पहिला बळी आहे. त्यामुळे बोरगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विदर्भातील अकोला आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने पुढील काही दिवस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.