पावसा पावसा थांब रे…! वावरात चिखल पाणीच पाणी ; पदरात पीक पडेल कसं ? शेतकऱ्यांची व्यथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

यंदाच्या खरिप हंगामात असमान पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा विदर्भात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही लागेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. आता गुलाब चक्रीवादळामुळे देखील मराठवाड्यात ,विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उभ्या पिकताच सोयाबीनला कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता पावसा पावसा थांब रे … ! म्हणण्याची वेळ आली आहे.

पावसा पावसा थांब रे...! वावरात चिखल पाणीच; पदरात पीक पडेल कसं?

परभणी तालुक्यामध्ये 984 मिमी पाऊस

परभणी जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .जिल्ह्यात 26 सप्टेंबर दुपार पर्यंत प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या नोंदीनुसार 1013.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 137.02 टक्के एवढा पाऊस पडला आहे .
यात सर्वाधिक पाथरी तालुक्यामध्ये 1212 मिमी ( 169 % ) , त्यापाठोपाठ 1131 मिमी ( 158%), सोनपेठ 973 मिमी (148% ) , मानवत 1025 मिमी (143%) , गंगाखेड 997 मिमी ( 142 %), सेलू1006 मिमी(140% ), जिंतुर 941 मिमी(132%), पुर्णा 966 मिमी(124%) व परभणी तालुक्यामध्ये 984 मिमी (124%) असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे . परभणी जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये 718.5 मिमी एवढा वार्षिक सरासरीचा पाऊस पडतो .

वावरत चिखल पाणी तर सोयाबीनला कोंब

20 सप्टेंबर 2021 रोजी कृषी विभागाच्या अहवालानुसार परभणी जिल्ह्यामध्ये 5 लाख 5 हजार 136 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 98 टक्के एवढी खरीप पेरणी झाली आहे .त्यामध्ये मुख्य पीक असणारे कापूस पीक 1 लाख 81 हजार 156 हेक्टर ,सोयाबीन 2 लाख 48 हजार 978 हेक्‍टर म्हणजे सोयबीन सरासरीच्या 114 टक्के क्षेत्रावर खरिपात पेरणी करण्यात आली आहे .सध्या हे दोन मुख्य पिके परिपक्व कालावधीमध्ये असून दसरा दिवाळीपूर्वी यातून उत्पादन मिळेल अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांना होती .तर 43 हजार 910 हेक्टर क्षेत्रावर खरिपात तुरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यापर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती .परंतु सतत पडणाऱ्या पावसाने शेतकर्‍यांचे अंदाज व आर्थिक गणित कोलमडले आहे . खरिपातील पिकांची अवेळी पानगळ , पाने पिवळे होत असून तुर ओंबाळण्याचे प्रमाण वाढले आहे . सोयाबीन च्या हिरव्या व परिपक्व शेंगामधून अंकुर बाहेर येत आहेत . खरीप हंगामाच्या सुरूवातीला पेरणी केलेल्या सोयाबीनची सध्या काढणी अवस्था असून शेतात सर्वत्र चिखल व पाणी असल्याने हे पीक पदरात कसे पडणार अशी चिंता स्थानिक शेतकऱ्यांना लागली आहे.

शासन व प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या

अतिवृष्टीने होत असलेल्या नुकसानी संदर्भात शेतकरी शासन व प्रशासनाकडे अर्ज विनंत्या करतानाही दिसून येत आहेत .शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना भरलेल्या पिकविम्यापोटी पिक विमा कंपन्यांनी 25% अग्रीम रक्कम अदा करावी असे आदेश काढले असले तरी अद्याप पर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर एक छदामही जमा झालेला नाही .मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाभर शेतीपिकांचे पाहणी केल्यानंतर तात्काळ अहवाल सादर करण्याचे सांगितले असून नुकसान भरपाई साठी शासनाकडून पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले आहे .