हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत काही नव्या पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहायला मिळते. तुम्ही देखील काही नव्या पद्धतीची शेती करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी बांबूची शेती हा चांगला पर्याय आहे. बांबूला हिरवं सोनं असं म्हटलं जातं. बांबूचा वापर विविध उद्योगधंद्यांत केला जातो. तसंच फर्निचर निर्मितीसह अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात (Bamboo Import) करतो. त्यामुळे तुम्हीदेखील या हिरव्या सोन्याची शेती करणार असाल तर तुम्ही लवकरच लखपती होऊ शकाल. बांबू शेती कशी करायची याबाबत माहिती घेऊया…
शासनाकडून मिळते अनुदान
देशातलं बांबू उत्पादन वाढावं, यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन सुरू केलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान दिलं जातं. देशात सातत्याने बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.
लागवड
बांबूची शेती हंगामानुसार केली जात नाही. तसंच अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही. एकदा बांबू लागवड केली, की 4 वर्षांनंतर बांबू कापणी केली जाते. बांबूच्या दोन झाडांमधलं अंतर 5 फूट ठेवावं लागतं. यानुसार 3 वर्षांत सुमारे 240 रुपये प्रति झाड खर्च येतो. यातही सरकार तुम्हाला 120 प्रति झाड याप्रमाणे शासकीय अनुदान देतं.
महत्वाचे मुद्दे
–बांबूशेती सुरू करण्यापूर्वी बांबूविषयी सर्वांगीण माहिती घेणं आवश्यक आहे.
–त्यानंतर तुम्हाला कोणत्या जातीच्या बांबूची लागवड करायची आणि बाजारात त्याची विक्री कशा पद्धतीनं करायची आहे, हे ठरवावं लागेल.
–बांबूच्या 136 जाती आहेत. त्यामुळे लागवडीच्या अनुषंगाने तुम्हाला शंका निर्माण होऊ शकतात, अडचणी येऊ शकतात.
–त्यामुळे कृषी विभागातल्या आपल्या जवळच्या कार्यालयात किंवा या विषयातल्या तज्ज्ञाकडून किंवा कृषी विज्ञान केंद्रातून याबद्दलची पूर्ण माहिती लागवडीआधीच मिळवणं अत्यावश्यक आहे.
–बाजारपेठ निश्चित माहिती झाल्याशिवाय उगाचच लागवड करण्याची घाई करून उपयोग नाही.
कसे मिळते उत्पन्न
तुम्ही 3 मीटर बाय 2.5 मीटर अंतरावर बांबूची झाडं लावली, तर एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 1500 रोपांची लागवड होईल. तसंच दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत तुम्ही अन्य पिकंही घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सुरू होऊ शकेल. दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचं झाड किमान 40 वर्षं जगू शकतं.