हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सर्वच भागांमध्ये भीषण (Monsoon Update) उकाडा जाणवत आहे. याशिवाय उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. अशातच आता मॉन्सून वाटचाल दमदारपणे सुरु आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच मॉन्सून दाखल झाल्याचे गुरुवारी (ता.३०) भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. त्यातच आता पुन्हा एक गोड बातमी असून, केरळनंतर आता मॉन्सून तामिळनाडूमध्ये दाखल झाला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) (Monsoon Update) आज (ता.1) देण्यात आली आहे.
20 जूनपर्यंत उत्तरप्रदेश गाठणार (Monsoon Update Today 1 June 2024)
भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, केरळमध्ये 30 मे रोजी मॉन्सून धडकला. साधारणपणे 1 जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा मॉन्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सून 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. 20 जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. अशातच केरळनंतर आज मॉन्सून तामिळनाडूत दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढला आहे.
अति मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, येत्या काही दिवसांत केरळमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. पुढील 24 तासांत केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन दिवसांमध्ये कोझिकोडच्या उरुमीमध्ये मॉन्सूनचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली आहे. मॉन्सून सध्या पूर्वोत्तर दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. तर याउलट महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कधी पोहचणार?
सध्याच्या घडीला भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकणारा मॉन्सून पश्चिम बंगालमध्ये पोहोचला आहे. यानंतर आता मॉन्सून बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत मॉन्सून अंदमान-निकोबार बेटे, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये पोहोचला आहे. कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात मॉन्सून 5 जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 10 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल. तर 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. तसेच 20 जूनपर्यंत मॉन्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.