Onion Theft : एक लाखाच्या कांद्याची चोरी; नाशिकच्या सटाण्यात चोरांनी मारला डल्ला!

Onion Theft Incident In Nashik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कांदा (Onion Theft) उत्पादक शेतकरी अपेक्षित दर मिळत नसल्याने आधीच मेटाकुटीला आले असताना आता कांदा चोरीची मोठी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने, काढणीनंतर झाकून ठेवलेला विक्रीसाठी तयार असलेला कांदा चोरीला गेला आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यात ही घटना घडली असून, संबंधित शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांहून अधिक आर्थिक (Onion Theft) नुकसान झाले आहे.

अपेक्षित भाव नसतानाही चोरी (Onion Theft Incident In Nashik)

अलीकडेच लसूण दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना लसणाच्या शेतात पहारा देण्याची वेळ आली होती. प्रमुख लसूण उत्पादक राज्य असलेल्या मध्यप्रदेश या राज्यामध्ये लसूण चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. ज्यामुळे शेतकरी आपल्या शेतांमध्ये सीसीटीव्ही तर काही शेतकरी बंदूक घेऊन रखवाली करत होते. मात्र, सध्या महाराष्ट्रात याउलट परिस्थिती असूनही, अर्थात कांद्याला अपेक्षित भाव नसतानाही कांदा चोरीची घटना समोर आली आहे.

1 लाख 35 हजाराचा खर्च

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालूक्यातील अंबासन परिसरात शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. या चाेरट्यांनी सुमारे 40 ते 45 क्विंटल कांदा चोरुन नेला आहे. प्राथमिक अंदाजानूसार, या कांद्याची किंमत सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत आहे. मालेगाव-नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतक-याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती. त्यासाठी त्यांना जवळपास 1 लाख 35 हजाराचा खर्च झाला होता.

पोलिसांकडून तपास सुरु

शेतकरी देवीदास कोर यांनी कांदा काढून शेतात शिरोळ्या करुन ठेवलेल्या होत्या. कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही कांदा ट्रॉलीमध्ये भरुन ठेवला होता. पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता, कांदा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत कांदा चोरीची तक्रार काेर यांनी दिली. दरम्यान, पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.