परतीचा पाऊस जोरदार …! राज्यात वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच राज्यात विजा मेघगर्जनेसह वळीव पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत तर तमिळनाडूच्या किनार्‍यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून केरळ कर्नाटक उत्तर कोकणा पर्यंत कमी दाबाचा हवेचा पट्टा विस्तारला आहे. तमिळनाडू पासून अरबी समुद्रापर्यंत पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रात व दक्षिण भारतात पावसाला पोषक हवामान आहे.

या भागाला यलो अलर्ट

कोकणातील सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागाला विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्र जवळ रविवार दिनांक 10 पर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवार पर्यंत म्हणजे दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनार्‍याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.