हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा तुलनेत अधिक पावसाची शक्यता (Soyabean Variety) वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने, 2024 च्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता असून, यंदा शेतकऱ्यांना या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सोयाबीनच्या दोन जातींबद्दल (Soyabean Variety) जाणून घेणार आहोत.
हेक्टरी 30 क्विंटलपर्यंतचे मिळेल उत्पादन (Soyabean Variety For Farmers)
सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे आज आपण सोयाबीनच्या अशा दोन प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या हेक्टरी 30 क्विंटलपर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या हंगामात सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडीबाबत विचार करत असाल तर या दोन्ही जाती उत्तम पर्याय ठरणार आहे.
सोयाबीनच्या प्रमुख जाती?
जे. एस. ३३५ : महाराष्ट्रात उत्पादित होणारे हे एक प्रमुख वाण आहे. या जातीची दरवर्षी राज्यातील अनेक शेतकरी लागवड करत आहेत. खरेतर सोयाबीनचा हे एक जुने वाण आहे. १९९४ मध्ये सोयाबीनची ही जात प्रसारित करण्यात आली आहे. तेव्हापासून या जातीची लोकप्रियता कायम आहे. कृषीतज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे सोयाबीनचा हे प्रमुख वाण असून, ९५-१०० दिवसांत या जातीचे पीक परिपक्व होत असते. ३८ × १० सेंमी अंतरावर याची लागवड केली जाऊ शकते. या जातीची मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास शेतकऱ्यांना 25 ते 28 क्विंटलपर्यंतचे सरासरी उत्पादन मिळू शकते.
जे. एस. २०९८ : सोयाबीनची ही देखील एक प्रमुख जात आहे. सोयाबीनची ही जात २०१७-१८ मध्ये विकसित झाली आहे. म्हणजे ही जात देखील सात वर्षांपासून बाजारात उपलब्ध असेल. हे एक उंच वाढणारे वाण आहे. हार्वेस्टरने जर काढणी केली तरी चालते. यामुळे जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या जातीच्या पेरणीला पसंती दाखवतात. ९५-९८ दिवसांत ही जात परिपक्व होते. या जातीपासून शेतकऱ्यांना सरासरी २५ ते २८ क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जात आहे.