हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील सोयाबीनला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत .त्यात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने घेतलेले सोयाबीन जोमात आले आहे. सद्यस्थितीत पिक फुल आवस्थेत व पपडी अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे .खरिपात काढणीवेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावत बियाण्यासाठी ही सोयाबीनचा दर्जा खालावला होता . परंतु आता येत्या खरीप हंगामासाठी उन्हाळी सोयाबीन मधुन मोठ्या प्रमाणावर बियाणे उपलब्ध होणार आहे. यंदा प्रथमच हे बदललेले चित्र दिसत आहे.
कृषि विभाग आणि महाबीजचा उपक्रम
खरिपातील सोयाबीनचे आतोनात नुकसान झाल्यानंतर कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. काही ठिकाणी बीजप्रक्रिया आणि त्यासंदर्भात उपक्रम देखील राबविले. उन्हाळी सोयाबीन हे मुख्यतः खरिपाचे बियाणे उपलब्ध होण्यास केले जाते. यंदाच्या वर्षी त्याला निसर्गाचीही साथ मिळाली आहे. उन्हाळी सोयाबीन साठलेल्या पाण्यावर जगत असल्यामुळे पाण्याची उपलब्धता पुरेशी झाली आहे. त्यामुळे यंदा खरिपासाठी चांगले बियाणे उपलब्ध होतील अशी अशा आहे. शिवाय यंदा महाबीजने देखील मोठ्या प्रमाणात बियाणांसाठी सोयाबीनची लागवड केली आहे.
फसवणुकीपासून बचाव
यापूर्वी खरिपासाठी बाहेरून बियाणे घेतले आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बऱ्याचदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकण्यात येतात. मात्र लवण होऊन झाल्यावर काही दिवसांनी बियाणे बोगस असल्याचे लक्षात येते. त्या स्थितीला शेतकरी काहीच करू शकत नसतो . मात्र यंदा असे होण्याची शक्यताही कमी असेल. कारण यावेळी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरचेच चांगले बियाणे उपलब्ध होतील.
बाजारात सोयाबीनला चांगला दर
मागील वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळतो आहे. म्हणूनच पारंपारिक हंगामी पीक सोडून शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले आहेत. रब्बी हंगामात ज्वारी ला फाटा देत उन्हाळी सोयाबीनची लावण करणे शेतकऱ्यांनी पसंत केले. सध्याचा मार्केटमधील सोयाबीनचा दर पाहता सोयाबीनला ७ हजार रुपयांचा दर मिळतो आहे. युद्ध परिस्थिती आणि इतर कारणांमुळे हा दर आणखी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. आता खरिपात निसर्गाची तेवढी योग्य साथ मिळावी एवढीच आशा शेतकऱ्यांना आहे.