हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील पूर्व भागात विशेषतः विदर्भ-मराठड्यात गारपिटीसह पाऊस (Weather Update) झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसाचीचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, अशातच आणखी तीन दिवस राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावणासह पावसाची शक्यता कायम असणार आहे. या कालावधीत प्रामुख्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना इशारा (Weather Update Today 13 Feb 2024 Maharashtra)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अचानक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
16 फेब्रुवारीनंतर वातावरण निवळणार
दरम्यान, राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील वाढ देखील कायम आहे. मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड (8.2 अंश) वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या वर नोंदवले गेले आहे. तर सोलापूर येथे 36.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान देखील कायम आहे. परिणामी, राज्यात ऊन, थंडी, पाऊस असे वातावरणातील चमत्कारिक बदल कायम आहे. मात्र, 16 फेब्रुवारीनंतर राज्यातील पावसाचे वातावरण निवळणार असून, थंडी देखील काहीशी कमी झालेली पाहायला मिळेल, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
38 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मागील दोन ते तीन दिवसामध्ये विदर्भात गारपिटीमुळे 38 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून, नुकसानग्रस्तांना मदतीचा हात द्यावा. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.