हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांची देखील दैना उडाली आहे. मात्र काळापासून पावसाने राज्यभरात उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पुढच्या तीन दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
21 जुलैनंतर जोरदार पाऊस
या पट्ट्याचे रूपांतर 24 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता असल्याने 21 जुलैनंतर पुन्हा राज्यात विशेषत: कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जुलै महिन्याची सरासरी राज्याने ओलांडली आहे.
३-४ दिवस पावसाचा जोर कमी
पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील 19 जुलैपर्यंत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान, गुजरातची किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.