हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा (Weather Update) पारा 40 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच आता उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी चक्रवातामुळे सुरु असलेल्या पावसाचा परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे. आजपासून (ता.15) पुढील पाच दिवस अर्थात 20 मार्चपर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना इशारा (Weather Update Today 15 March 2024)
भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पुढील पाच दिवस विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या कालावधीत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पिकांना फटका बसण्याची शक्यता
यावर्षीच्या रब्बी हंगामात प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीपासून ते आतापर्यंत राज्यात अनेकदा अवकाळी पाऊस अनुभवायला मिळाला. अशातच आता पुन्हा एकदा पुढील पाच दिवस पाऊस राज्यात ठाण मांडणार असल्याने, उशिरा पेरणी झालेल्या काढणी अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांना फटका बसल्याची शक्यता आहे. याशिवाय अवकाळी पाऊसासह ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक भागामध्ये कांदा बियाण्यासाठीचे डोंगळे वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे कांदा बियाणे उत्पादनास देखील या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘या’ राज्यांना अलर्ट कायम
दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेले पावसाचे वातावरण कायम असून, पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने 15 ते 20 मार्चदरम्यान झारखंड आणि ओडिसा, 16 ते 20 मार्चदरम्यान महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि पूर्व मध्यप्रदेश, 15 आणि 16 मार्च रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्किम या राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये काही भागांमध्ये विजांचा गडगडाट तर काही भागांमध्ये ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.