Weather Update : नागपूर, नांदेडला पावसाने झोडपले; पहा.. आज कुठे पडणार पाऊस?

Weather Update Today 17 March 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. शनिवारी (ता.16) संध्याकाळच्या सुमारास राज्याची उपराजधानी नागपूरला विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर तिकडे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुढील दोन दिवस विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे.

पिकांचे मोठे नुकसान (Weather Update Today 17 March 2024)

शनिवारी संध्याकाळी जवळपास अर्धा तास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे (Weather Update) नागपुर शहरात जवळपास 15 ते 16 झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. तर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागाला देखील मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर संत्रा पिकाला या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने, त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत कायम आहे. ज्यामुळे सध्या भर उन्हाळयात पाऊस पडत असल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ते 19 मार्च दरम्यान विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम असणार आहे. पुढील दोन दिवस वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.