हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात विदर्भ-मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह (Weather Update) अवकाळी पाऊस झाला. मात्र आता चालू आठवड्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी नागपूर मार्च महिन्यामध्येच तापली असून, नागपुरात कमाल तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहचला आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये देखील सध्या 40 अंशांहून अधिक तापमान पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत असून, शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांना देखील या उन्हाच्या तापेमुळे (Weather Update) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
40 अंशांहून अधिक तापमान कुठे? (Weather Update Today 25 March 2024)
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर नागपूर येथे 44 अंश, अकोला 42.9 अंश, धुळे 41.3 अंश, सोलापूर 41.2 अंश, वर्धा 41.1 अंश, औरंगाबाद 40.8 अंश या शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशाहून अधिक आहे. मागील तीन ते चार दिवसांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली आहे. याशिवाय राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या किमान तापमानाचा पारा 23 ते 25 अंशांपर्यंत पोहचले आहे. ज्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. अशातच आता पुढील काही दिवसांमध्ये उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘या’ राज्यांना आयएमडीचा इशारा
दरम्यान, पुढील दोन दिवस पूर्व किनारपट्टीवरील झारखंड, ओडिसा, बिहारचा काही भाग तसेच हिमालयीन राज्यांसह ईशानेकडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे. देशाच्या पश्चिमी भागातून येणाऱ्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही राज्यांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच आता येत्या 26 मार्च रोजी पश्चिम हिमाचल प्रदेशावर पश्चिमी चक्रवाताचा पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. तसेच या दोन दिवसांमध्ये उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात जोरदार वारे वाहू शकतात. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.