Monsoon Update : आनंदाची बातमी! 2 दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल; आयएमडीची माहिती

Monsoon Update Enters In Kerala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा उन्हाने कहर चांगलाच केला आहे. उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही (Monsoon Update) होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे मॉन्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे. अशातच आता दोन दिवस आधीच म्हणजे आज (30 मे) मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उत्तर-पूर्व भारताच्या काही भागांत आणि केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे. अशी माहिती आज सकाळीच अधिकृतरीत्या भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मॉन्सूनच्या आगमनाची आतुरता (Monsoon Update) लागून राहिलेल्या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आठवडाभरात महाराष्ट्रात दाखल होणार (Monsoon Update Enters In Kerala)

मॉन्सून केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होत असतो. परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल (Monsoon Update) झाला आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मॉन्सून वेळेपूर्वीच 19 मे रोजी दाखल झाला होता. मॉन्सूनची वाटचाल अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात मॉन्सून दाखल होईल, अशी आशाही हवामान विभागकडून व्यक्त करण्यात आली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 10 जूनच्या आत मॉन्सूनचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

देशभरात यंदा चांगला मॉन्सून असणार आहे. सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. त्यानुसार सध्या केरळमध्ये मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मॉन्सून मजबुत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मॉन्सून लवकर बरसेल, असाही अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. यात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांचा संपूर्ण परिसर मॉन्सून 5 जूनपर्यंत व्यापेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

मागील वर्षी देशभरातील अनेक भागांत मॉन्सूनने सरासरी गाठली नव्हती. महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. या पावसाचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला होता. आता मे महिन्यातच राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मॉन्सूनची केरळपर्यंत वाटचाल दमदार झाली आहे. मॉन्सून वेळेआधीच आल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.