उस्मानाबादेत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू ; पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कायम

heat wave
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानाचा पारा अधिक वेगाने वाढताना दिसतो आहे. मार्च महिन्यामध्येच मराठवाडा विदर्भात तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या वर मजल मारली आहे. राज्यातल्या इतर भागातही तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. उस्मानाबादेत एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी घेतला आहे.

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे (वय वर्ष ५०) नामक व्यक्ती शेतामध्ये काम करत असताना त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने त्यांनी घाईघाईत पाणी पिलं आणि त्यानंतर त्यांना उष्माघाताचा झटका आला. त्यानंतर लगेचच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि गावकर्‍यांनी त्यांना उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. दरम्यान येत्या तीन दिवसात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी थेट उन्हात जाणं टाळावं तसेच शेतातील कामंही भर उन्हात करू नयेत. आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्याचे तापमान हे मार्च महिन्यापासून अधिकच वाढताना दिसत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये मूलभूत मुबलक औषधे उपलब्ध करून दिली आहेत तसंच पाच बेड आणि कुलर ही ठेवण्यात आला आहे.

येत्या तीन-चार दिवसात महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली आहे. चंद्रपुरात कमाल तापमान 44 अंश डिग्री सेल्सिअस दिनांक 31 मार्च रोजी नोंदवण्यात आले आहे. मराठवाड्यातील इतर अकोला, अमरावती ,गोंदिया ,नागपूर ,वाशीम ,वर्धा या ही जिल्ह्यांमध्ये चाळीस अंशांच्या वरती तापमान गेले आहे तर अकोल्यात 43 पॉईंट एक अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन-चार दिवसात महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

1 एप्रिल – आज दिनांक 1 एप्रिल रोजी जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, परभणी ,जालना ,बुलढाणा ,अकोला ,वाशिम ,अमरावती, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2- एप्रिल – 2 एप्रिल करीता औरंगाबाद, जालना ,परभणी ,हिंगोली ,नांदेड, बुलढाणा आणि अकोला या जिल्हा ना यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

3 एप्रिल – तिन एप्रिल साठी केवळ बुलढाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.