हॅलो कृषी ऑनलाइन : बंगालच्या उपसागरात सध्या चक्री वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातल्या काही भागात तीव्र उष्णता तर काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर अंदमान समुद्र व लगतच्या दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर तीव्र दाबाचे क्षेत्र येत्या बारा तासात तीव्र होण्याची शक्यता असून चक्रीवादळाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच अंदमान बेटांपासून पासून हे उत्तरेकडे सरकेल आणि 23 मार्चला पहाटे मॅनमार जवळ 18 ते 19 डिग्री दरम्यान म्यानमारचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता
दरम्यान आज सकाळी नऊ वाजता नोंदवलेल्या निरीक्षणानुसार विदर्भातील काही भाग वगळता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर ढग विखुरलेले पाहायला मिळाले मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे या भागावर दाट ढग दाटलेले दिसून आले आहेत त्यामुळे या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
येत्या २४ तासातील हवामान अंदाज
दरम्यान पुढील 24 तासांत, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान समुद्र, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरावर समुद्राची स्थिती उग्र ते अत्यंत उग्र असेल.येत्या २४ तासात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये काही मध्यम ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.पुढील २४ तासांत पश्चिम राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.